ड्रीम११ने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व सोडले; बीसीसीआय नव्या पर्यायाच्या शोधात

 

जळगाव समाचार | २५ ऑगस्ट २०२५

केंद्र सरकारने नुकतेच ‘ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५’ मंजूर केल्यानंतर फँटसी स्पोर्ट्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ड्रीम११ ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) संघाचे मुख्य प्रायोजकत्व संपुष्टात आणण्याचा निर्णय कळवला आहे. या कायद्यामुळे भारतात रियल मनी गेमिंग सेवा आणि जाहिरातींवर बंदी आल्याने कंपन्यांच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. २०२३ मध्ये ड्रीम११ने बीसीसीआयसोबत २०२६ पर्यंत ४.४ कोटी डॉलर (सुमारे ३५८ कोटी रुपये) इतक्या रकमेचा करार केला होता.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी सांगितले की, “ऑनलाइन गेमिंग विधेयकानंतर बीसीसीआय आणि ड्रीम११ परस्पर संमतीने आपले व्यावसायिक संबंध संपुष्टात आणत आहेत. भविष्यात अशा कोणत्याही संस्थांसोबत करारबद्ध होणार नाही, याची मंडळ काळजी घेईल.” दरम्यान, बीसीसीआय नवीन प्रायोजकासाठी पर्यायी पर्यायांचा विचार करत असून लवकरच निविदा प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे.

टी-२० आशिया चषक स्पर्धेला अवघ्या दोन आठवड्यांवर पडदा उघडत असताना भारतीय संघाला टायटल प्रायोजकाशिवाय मैदानात उतरावे लागू शकते. ड्रीम११सारख्या मोठ्या जाहिरातदाराने माघार घेतल्याने क्रीडा जाहिरात क्षेत्रात मोठा आर्थिक उलथापालथ होणार असून येत्या काही दिवसांत बीसीसीआय कोणत्या नव्या प्रायोजकाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here