4 महिन्यांचा संसार, विवाहित डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळली; मन हेलावणारे शेवटचे शब्द लिहून केली आत्महत्या…

 

जळगाव समाचार डेस्क। २७ ऑगस्ट २०२४

 

येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे असे या विवाहितेचे नाव असून तिने आपल्या शेवटच्या पत्रात आपल्या मनातील वेदना मांडल्या आहेत. हे पत्र वाचल्यावर कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

प्राप्त माहितीनुसार, प्रतीक्षा आणि प्रीतम यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. संसार आणि नवऱ्याकडून प्रत्येक मुलीच्या काही अपेक्षा असतात, मात्र प्रतीक्षाचे हे स्वप्न चुरगळले गेले. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने अखेर टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेनंतर प्रतीक्षाच्या वडिलांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पती प्रीतम शंकर गवारे याच्या विरोधात हुंडाबळी आणि पत्नीला त्रास दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच प्रीतम फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
प्रतीक्षा गवारे यांचे शेवटचे पत्र: हृदयद्रावक वेदना आणि निराशेचा कागदावर उमटलेला स्वर
डॉक्टर प्रतीक्षा प्रीतम गवारे यांची आत्महत्या हा एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक प्रसंग आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या आपल्या शेवटच्या पत्रात त्यांनी आपले वेदना, निराशा, आणि अपेक्षाभंग व्यक्त केला आहे. या पत्रात त्यांनी पतीच्या वागण्यामुळे कसा त्रास सहन केला, कसे स्वप्न मोडले, आणि आपल्या जिव्हाळ्याच्या स्वप्नांना कसा तडा गेला, हे मांडले आहे.
प्रतीक्षाने आपल्या पतीवर जीवापाड प्रेम केले होते. तिने त्याच्यासाठी सर्वस्व विसरून स्वतःला बदलले, पण त्याला हे कधीच पुरेसे वाटले नाही. तीने आपल्या स्वप्नांचा त्याग केला, पतीची अपेक्षा पूर्ण केली, परंतु तिला नेहमीच संशय आणि त्रास सहन करावा लागला. तिच्या मनीच्या दुःखाचे प्रतिबिंब तिच्या कवितांमध्येही उमटले आहे, ज्या तिच्या पत्रात आढळतात.
प्रतीक्षा यांचे हे पत्र केवळ तिच्या वेदनांचे चित्रण करत नाही, तर त्यांच्या पतीला शेवटचा संदेश देते. तिच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणीही ती पतीच्या आणि सासरच्या काळजीत होती, परंतु तिला मिळालेली वेदना अतिशय खोलवर जखमा करून गेली होती. शेवटच्या वाक्यात तिने पतीला दिलासा देणारा संदेश दिला आहे आणि आपले प्रेम व्यक्त केले आहे.
ही घटना अत्यंत गंभीर आहे, जी समाजाला स्त्रीच्या मनातील दुःखाची जाणीव करून देते.

डॉ. प्रतीक्षा यांचे काळीज पिळवटून टाकणारे शेवटचे शब्द…

Dear Aaho..
खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

तिने आपल्या वेदना या पत्रात कवितेतूनही मांडली आहे.

माझ्या मनीचे दुःख सारे कधी तु जाणवलेच नाही
पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही.

तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तु पहिले नाही
तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबले नाही
नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षड्यंत्र काही

हा पण प्रेम होते आणि आहे (हे लिहून वाक्य खोडलं आहे)
दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही
मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही
तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही.

तुझ्याचपासून सुख माझे तुझ्याच‌साठी सर्व काही
मी स्वत:ला हरवून आले, याचे मला दुःख नाही
तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही
तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही

तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर एतर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
तुमचीच
प्रतीक्षा

या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून प्रतीक्षाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here