जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ म्हणजे परस्पर शुल्क लादल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार जगतात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी या टॅरिफनंतर जगभरातील नेत्यांची खिल्ली उडवत काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे.
नॅशनल रिपब्लिकन काँग्रेस कमिटीत बोलताना ट्रम्प म्हणाले, “अनेक देश अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्यासाठी उतावळे आहेत. ते काहीही करण्यास तयार आहेत.” यावेळी त्यांनी अत्यंत अश्लील भाषेत काही देशांच्या नेत्यांविषयी वक्तव्य केल्याचा आरोप आहे. ट्रम्प म्हणाले की, “हे देश माझ्या *** किस करण्यास तयार आहेत.”
या वक्तव्यानंतर भारतातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. सोशल मीडियावर पोस्ट करत आव्हाड म्हणाले, “ट्रम्प यांनी अत्यंत कुत्सित आणि गलिच्छ शब्दांत जगातील राष्ट्रप्रमुखांची टिंगल केली आहे.”
फ्रान्समध्ये अनियंत्रीत राजेशाही आणि वाढती महागाई विरोधात सन 1789 मध्ये जनतेने उठाव केला. त्यावेळी फ्रान्सची राणी मेरी अँटोइनेट ही देखील भूक आणि महागाई विरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेची टिंगल करायची. एकदा तिने, “पाव मिळत नसेल तर केक खा”, असे वाक्य उच्चारले. त्यामुळे चिडलेल्या फ्रेंच जनतेने राज्यसत्तेला हादरा दिला अन् आणि 9 नोव्हेंबर 1799 रोजी राज्यसत्ता उलथवून टाकली; या क्रांतिकारक घटनेला फ्रेंच राज्यक्रांती म्हणतात, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली.
दरम्यान, ट्रम्प यांनी आणखी काही नव्या वस्तूंवर, विशेषतः औषधांवर मोठं शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. तसेच, चीनपासून दूर राहण्याचा सल्ला देत अमेरिकेसोबत व्यापार करू इच्छिणाऱ्यांनी नवीन अटी स्वीकाराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय आणि व्यापारी चर्चांना उधाण आले आहे.