जळगाव समाचार | १७ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी पदवीधरांना ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (CCMP) आणि प्रमाणपत्रावर आधारित नोंदणीस परवानगी दिल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) जळगाव शाखेने गुरुवार, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी एकदिवसीय राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडी आणि रुग्णालये पूर्णपणे बंद राहणार असून, आपत्कालीन सेवा (इमर्जन्सी) देखील प्रभावित होणार आहेत. आयएमएने नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, आवश्यक वैद्यकीय मदतीसाठी शासकीय रुग्णालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
शासनाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार CCMP प्रमाणपत्र असलेल्या होमिओपॅथी पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे. आयएमएने हा निर्णय ‘मिक्सोपॅथी’ला अधिकृत मान्यता देणारा आणि रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचा आरोप करत तीव्र विरोध दर्शवला आहे. यापूर्वी ११ जुलै २०२४ रोजी अशा नोंदणीस स्पष्ट मनाई करणारा आदेश शासनाने दिला होता. त्यामुळे अचानक घेतलेला हा निर्णय धक्कादायक असून, तो न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा विचार न करता घेतल्याने कायदेशीर प्रक्रियेचा अपमान असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीची अखंडता जपण्यासाठी आणि रुग्णांचे हित साधण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. सर्व नागरिकांनी परिस्थिती समजून सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.

![]()




