जळगाव समाचार डेस्क | ६ सप्टेंबर २०२४
एसटी महामंडळाने दिव्यांग प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता दिव्यांग प्रवाशांसाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसने उपलब्ध असणार आहेत. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर चढले तरी त्यांच्या आरक्षित आसनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी वाहकावर असणार आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात साध्या बसेस पासून शिवनेरी बसेसपर्यंत सर्व गाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी आरक्षित आसने राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जर दिव्यांग प्रवासी बसमध्ये नसतील, तर हे आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. मात्र, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यास वाहकाने त्वरित त्यांचे आसन त्यांना उपलब्ध करून द्यावे.
याशिवाय, दिव्यांग प्रवाशांना चढ-उतार करताना प्राधान्य देण्याचे आणि त्यांचा थांबा आल्यास त्यांना सूचित करून सुरक्षितरीत्या उतरण्याची सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश वाहक आणि चालकांना देण्यात आले आहेत.