जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२६
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. शिवाजीनगर परिसरातील राजू राजे यांच्या शेतातील उघड्या विहिरीत (एमएच १५ जेएस १०५३) क्रमांकाची कार अनियंत्रित होऊन कोसळली आणि या भीषण अपघातात कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरीमार्गे प्रवास करत असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका तसेच इंदोरे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र कार विहिरीत खोल पाण्यात बुडाल्याने बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. रात्रीचा अंधार, विहिरीतील चिखल आणि पाण्याची खोली यामुळे मृतदेह बाहेर काढणे आणि वाहन वर आणणे हे मोठे आव्हान ठरले. अखेर उशिरा क्रेन व हायड्रा यंत्रणा मागवून बचाव कार्य राबवण्यात आले आणि मध्यरात्री सुमारे एक वाजेपर्यंत अथक प्रयत्नांनंतर कार बाहेर काढण्यात आली. त्यानंतर सर्व नऊ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश असून त्यांची नावे सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे आणि श्रावणी अनिल दरगोडे अशी आहेत. उर्वरित चार मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. या भीषण घटनेमुळे इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

![]()



