साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धुळे : -शेतातील घरामध्ये सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला असून शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट येथील मोमल्या पावरा याच्या शेतातील घरात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार , पथकाने ४ रोजी मध्यरात्री छापा टाकला. या घरात देशी दारूचे १२ खोके, मशीन, एका प्लास्टिक ड्रममध्ये २०० लिटर स्पिरीट, इतर साहित्य, ७ लाख रुपये किमतीचे वाहन (एमएच ०६-बीजी ३६५१), असा एकूण ८ लाख ५६ हजार ९३८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित मोमल्या पावरा (रा. फत्ते फॉरेस्ट), संदेश पावरा (रा. मोही, ता. शिरपूर) व त्यांचे ४ साथीदार यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.