जळगाव समाचार डेस्क| २० सप्टेंबर २०२४
नाशिक येथील पती-पत्नी व मुलीच्या आत्महत्येच्या घटनेने सारा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच धुळ्यातही एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पती-पत्नी व त्यांचे दोन मुलांनी गळफास आणि विषारी औषध प्राशन करून आपला जीवनप्रवास संपवला. या धक्कादायक घटनेमुळे धुळे शहरात खळबळ माजली आहे.
समर्थ कॉलनीत घडलेल्या या घटनेत प्रवीण मानसिंग गिरासे (वय ४५), गीता प्रवीण गिरासे (वय ४२), मितेश प्रवीण गिरासे (वय १७) आणि सोहम प्रवीण गिरासे (वय १५) या चौघांनी आत्महत्या केली. प्रवीण गिरासे यांनी गळफास घेतला, तर त्यांच्या पत्नी व मुलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
गिरासे कुटुंबीयांनी आत्महत्येपूर्वी शेजाऱ्यांना आपल्या मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जाण्याचे कारण दिले होते. मात्र, त्यांच्या घराचा दरवाजा तीन दिवसांपासून बंद होता. कुटुंबातील नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी गुरुवारी आले असता, घरात या चौघांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
प्रवीण गिरासे हे धुळे शहरात खताचे दुकान चालवत होते. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास सुरू आहे. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, या घटनेपूर्वीच नाशिक येथील इंदिरानगरमध्ये बुधवारी पती-पत्नीने आपल्या ९ वर्षीय मुलीला विषारी औषध देऊन स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनांनी महाराष्ट्रात चिंता आणि खळबळ माजवली आहे.

![]()




