जळगाव समाचार | १८ एप्रिल २०२५
धुळे शहरातील नंदी रोडवर बुधवारी रात्री १७ वर्षीय फैज अहमद अन्सारी याचा डोकं रस्त्यावर आपटून खून करण्यात आला. हा प्रकार मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास घडला. फैज हा मच्छीबाजार भागातील गल्ली क्रमांक सात येथे राहतो. तो निशांत चौकातील एका मेडिकल दुकानात कामाला होता.
कामावरून मोटरसायकलने घरी जात असताना नंदी रोडवर त्याला अज्ञात वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून दोघांशी वाद झाला. वाद विकोपाला जाऊन दोघांनी फैजला शिवीगाळ करत दमदाटी केली व मारहाण सुरू केली. त्यांनी फैजचे डोके सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर तब्बल ५ ते ६ वेळा जोरात आपटले. यात तो गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी लोकांनी धाव घेऊन फैजला हिरे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. फैजचे वडील काही वर्षांपूर्वी वारले असून तो आईसोबत राहत होता. त्याला भाऊ-बहीण नसून आई मजुरी करून त्याचे पालनपोषण करत होती. आईला आधार देण्यासाठी फैज काम करत होता.
या प्रकरणी फैजचा नातेवाईक मोहंमद साजिद अन्सारी यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक एस. टी. घुसर यांच्याकडून तपास सुरू असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एकजण अल्पवयीन असून दुसऱ्याच्या जन्मदाखल्याची चौकशी सुरू आहे.
घटनेच्या ठिकाणाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फैजच्या डोक्याला खोलवर जखम झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.