धुळे हादरले; साखरपुड्यात जुना वादातून तिघांचा खून, आरोपी ताब्यात

 

जळगाव समाचार | २० फेब्रुवारी २०२६

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शिवारात असलेल्या घोडेमाळ (ता. साक्री) येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमात उफाळलेल्या जुन्या कौटुंबिक वादातून तिघांचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. विजू गोसावी यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यापूर्वी सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान दोन गटांत वाद निर्माण झाला आणि काही क्षणांतच त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. या घटनेत सुरेश गोसावी (५०), साहिल गोसावी (३५) आणि देवेंद्र पवार (३६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्राथमिक माहितीनुसार, मोबाईलवर ठेवलेल्या चिथावणीखोर स्टेटसबाबत जाब विचारल्याने वादाला सुरुवात झाली. गुजरात राज्यातील सोनगड येथून आलेल्या वर्‍हाडी मंडळींनी वधू पक्षातील व्यक्तींवर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून उपस्थित पाहुण्यांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काहींनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळ सोडले, तर काहींनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर संशयित आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ हालचाल करून ओटाबारी घाट परिसरात वाहन अडवले. कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) तसेच वाहन चालक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले असून ते सर्वजण सोनगड (गुजरात) येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा सखोल तपास सुरू असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविणे, घटनास्थळावरील पुरावे संकलित करणे व आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here