जळगाव समाचार डेस्क | ६ फेब्रुवारी २०२५
धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून सुनील नारायण कोळी या व्यक्तीने स्वतःच्या दोन लहान मुलांना तापी नदीत फेकून ठार मारले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, थाळनेर येथील कुंभार टेक भागात राहणारा सुनील कोळी याला दारूचे व्यसन होते. सतत दारू पिण्याच्या कारणावरून त्याचा आणि नातेवाईक छायाबाई संजय कोळी यांच्यात वाद होत असत. घटनेच्या दिवशी सुनीलने दारू पिण्यासाठी छायाबाईंकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.
या नकारामुळे संतापलेल्या सुनील कोळीने आपला पाच वर्षांचा मुलगा कार्तिक सुनील कोळी आणि तीन वर्षांची मुलगी चेतना सुनील कोळी यांना सोबत घेतले आणि गावाजवळील तापी नदीच्या पात्रात दोघांना फेकून दिले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तातडीने मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
या प्रकरणी छायाबाई संजय कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये सुनील कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असून धुळे जिल्ह्यातील विविध संशयित ठिकाणी त्याचा तपास सुरू आहे.
एका बापाने केवळ दारूसाठी पैसे न मिळाल्याने आपल्या निष्पाप मुलांचा जीव घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरपूर तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.