जळगाव समाचार | १२ नोव्हेंबर २०२५
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने ते रुग्णालयात उपचार घेत होते. या काळात त्यांच्या सोबत पत्नी हेमा मालिनी, मुलं सनी आणि बॉबी देओल, तसेच ईशा देओल सतत उपस्थित होते. धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या आणि निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती.
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बॉबी देओल स्वतः वडिलांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन आला. धर्मेंद्र यांच्या घरासमोरचा व्हिडीओ पापाराझी अकाउंट वरिंदर चावला यांनी शेअर केला असून, त्यात रुग्णवाहिका आणि बॉबी देओल घरी पोहोचताना दिसत आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली असून, धर्मेंद्र यांना घरी नेण्यात आल्याचे पुष्टी करण्यात आली आहे. पुढील काही दिवस त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू राहतील, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सनी देओलच्या मॅनेजरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांची काळजी घरी घेतली जाणार आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्या तसेच कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. धर्मेंद्र यांना प्रेम आणि प्रार्थना करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार.” धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून, चाहत्यांनीही त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

![]()




