जळगाव समाचार | २२ एप्रिल २०२५
धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्याजवळ आज दि. २२ एप्रिल रात्री आठ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून गोळीबार करत एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. गोळी डोक्यात लागल्याने पीडिताचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गोळीबार केल्यानंतर आरोपीने स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
मृत युवकाचे नाव गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) असे आहे. तो आपल्या कुटुंबासह वाकटुकी गावात राहत होता. प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री तो वाकटुकी फाट्यावर आला असताना, दबा धरून बसलेल्या आरोपीने त्याच्यावर गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी थेट डोक्यात लागल्याने गोपाळ मालचे यांचा जागीच मृत्यू झाला.
पंधरा वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला?
प्राथमिक तपासानुसार, ही हत्या पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या बदल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) असे आरोपीचे नाव असून, त्याचे वडील ज्ञानेश्वर सावंत कोळी यांचा २०१० साली खून झाला होता. त्या खुनाच्या प्रकरणात गोपाळ मालचे यांच्यावर गुन्हा दाखल असून ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर राहुल सावंतने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परिसरात तणावाचे वातावरण
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.