जळगाव समाचार | ४ डिसेंबर २०२५
धरणगाव पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (३१) आणि खासगी इसम सागर शांताराम कोळी (३०, रा. निंभोरा) यांच्याविरोधात १० हजार रूपये लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई बुधवारी केली. तक्रारदाराला पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२४-२५ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. पहिला हप्ता सुमारे १५ हजार रुपये फेब्रुवारी २०२५ मध्ये जमा झाल्यानंतरही दुसरा हप्ता न मिळाल्याने तक्रारदाराने आठ जुलै रोजी पंचायत समितीत अभियंता पाटील यांची भेट घेऊन चौकशी केली.
या भेटीत अभियंता पाटील यांनी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले; मात्र गावातील इतरांकडून तक्रारदाराला दुसरा हप्ता जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे परत विचारणा केली असता, अभियंता गणेश पाटील यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १० हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर विभागाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, अभियंता पाटील यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले तसेच खासगी इसम सागर कोळीने १६ जुलै रोजी त्याच्या मोबाईलवरून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. खात्रीशीर पुरावे गोळा केल्यानंतर दोघांवरही धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि सापळा पथकातील बाळू मराठे, राकेश दुसाने, गणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

![]()




