जळगाव समाचार | २९ मे २०२५
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी या गावात आरोग्य यंत्रणेच्या कमतरतेमुळे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्यामुळे एका आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. लुगड्याचा आडोसा करून त्या महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये काही महिला तिच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहे. एक महिला तिला आधार देत होती, तर इतर महिला लुगडं धरून आडोसा करत होत्या. प्रसूतीनंतर महिलांनी बाळाची नाळही तोडली.
या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारवर टीका करत विचारले की, “देश जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, पण आरोग्य सुविधा अजूनही गावागावात पोहोचलेल्या नाहीत. अजून किती दिवस महिलांची अशी हेळसांड होत राहील?”
रोहिणी खडसे यांनी असेही नमूद केले की, “जळगाव जिल्ह्यात चार मंत्री असतानाही आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, हे अत्यंत लाजीरवाणे आहे.”
व्हिडीओ
ही घटना केवळ एक दुःखद प्रसंग नसून, संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे आणि ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य सुरक्षेच्या दुर्लक्षिततेचे प्रतीक बनली आहे.