जळगाव समाचार | १४ जून २०२५
रावेर तालुक्यातील तासखेडा गावात काल (१३ जून) सकाळी भीषण घटना घडली. उघड्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने मुलगी आणि तिला वाचविण्यास गेलेल्या वडिलांचा मृत्यू झाला. समाधान तायडे (वय ३६) आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी मानवी तायडे अशी मृतांची नावे आहेत.
समाधान तायडे हे केळी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काल सकाळी पाच-सहा वाजेच्या दरम्यान मानवी घरासमोर खेळत असताना तिला उघड्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला. धक्का बसताच ती जमिनीवर कोसळली. हे पाहताच समाधान तायडे धावले, मात्र वडिलांना देखील विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा देखील मृत्यू झाला.
दोघांचे मृतदेह उपचारासाठी भुसावळ येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे तासखेडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.