जळगाव समाचार | १८ फेब्रुवारी २०२६
शहरातील भास्कर मार्केटसमोरील पोलीस दलामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावर सुमारे एक कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पोलीस दलाच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत संबंधित पेट्रोल पंप चालविला जातो. पंपावरील दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. रोख रक्कम नियमितपणे बँकेत जमा करणे, रोख वही अद्ययावत ठेवणे तसेच भरणा पावती पुस्तके सादर करणे याबाबत वरिष्ठांकडून त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र विविध कारणे सांगत त्यांनी कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
लेखापाल एस. आर. पलोड यांनी १ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीचे लेखापरीक्षण केल्यानंतर हा प्रकार समोर आला. या कालावधीत एकूण चार कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची पेट्रोल विक्री झाल्याची नोंद आहे. त्यापैकी केवळ तीन कोटी ५९ लाख २५ हजार १८ रुपये बँकेत जमा झाल्याचे आढळले, तर उर्वरित एक कोटी ३३ लाख ७५२ रुपये जमा न झाल्याचे निष्पन्न झाले. तपासणीदरम्यान पंपाच्या तिजोरीत फक्त एक लाख ९६ हजार २१९ रुपये आढळले. बँक भरणा पावत्या व संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याने अपहाराचा संशय अधिकच बळावला.
दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांचा मुलगा शेखर वाघ यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. वडील कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याची माहिती देताना पेट्रोल पंपाच्या हिशेबात मोठी गडबड झाल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अधीक्षकांनी मानव संसाधन विभागाचे प्रभारी संदीप पाटील यांना तत्काळ व्यवहारांची खात्री करण्याचे आदेश दिले. पुढील पडताळणीत अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभारी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१६ (५) (लोकसेवकाद्वारे फौजदारी विश्वासघात) आणि कलम ३१८ (४) (फसवणूक) अन्वये वाल्मीक मधुकर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत. दरम्यान, इतक्या मोठ्या रकमेचा अपहार दीर्घकाळ वरिष्ठांच्या निदर्शनास का आला नाही, आर्थिक नियंत्रण यंत्रणा का निष्क्रिय ठरली, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून फरार आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

![]()




