जळगाव समाचार डेस्क | २९ ऑगस्ट २०२४
पाचोरा येथे दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात दुर्दैवी घटना घडली आहे. थर लावताना एक गोविंदा खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला होता, आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृत गोविंदाचे नाव नितीन चौधरी (27) असे आहे, त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील रिक्षा स्टॉप येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. नितीन चौधरी आपल्या गोविंदा पथकासह या कार्यक्रमात सहभागी झाला होता. थर लावत असताना नितीनचा पाय घसरला आणि तो खाली पडला. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नितीन रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.