जळगाव समाचार | १ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या नवीपेठेतील ब्रिटिशकालीन इमारतीला ‘दगडी बँक’ म्हणून ओळखले जाते. शंभर वर्षांची परंपरा लाभलेली ही वास्तू विक्रीस काढण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला ज्येष्ठ संचालक तथा आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
बैठकीत सरकारी नोंदणीकृत मूल्य निर्माता यांचा अहवाल चर्चेस ठेवण्यात आला. त्यानुसार ६५०० चौरस फूट चटई क्षेत्रासाठी प्रतिचौरस फूट ४० हजार रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून, इमारतीचे अंदाजित मूल्य सुमारे १२ कोटी रुपये ठरविण्यात आले. त्याशिवाय अतिरिक्त १५ कोटी रुपयांची अपेक्षा ठेवून जाहिरात प्रसिद्ध करण्यास मंडळाने यापूर्वीच मान्यता दिली होती. बुधवारीच्या बैठकीत या विक्री प्रक्रियेस पुढील कार्यवाहीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.
मात्र, जिल्हा बँकेची सध्याची आर्थिक स्थिती सक्षम असून, अशा स्थितीत स्वतःची ऐतिहासिक मालमत्ता विकण्याची अजिबात गरज नाही, असे आमदार खडसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी अध्यक्ष संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात, “पुरातन व प्रतिष्ठेची ही वास्तू विकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला आम्ही ठाम विरोध करतो,” असे नमूद केले. स्वतःच्या भावाच्या निधनामुळे खडसे बैठकिला अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे बैठकीत त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही संचालकांनी विक्रीला विरोध दर्शविला नाही.
याच बैठकीत सहकार आयुक्तांची परवानगी घेऊन रखडलेली नोकरभरती मार्गी लावण्याचा विषयही चर्चेत आला आणि त्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.
सध्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे आहे. संचालक मंडळात आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल पाटील, किशोर पाटील आदींचा समावेश असून बहुसंख्य मंडळ विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या गटाकडे आहे. दुसरीकडे, विरोधक म्हणून खडसे पिता–कन्या जोडी, ॲड. रवींद्र पाटील आदी अल्पसंख्य संचालक कार्यरत आहेत.
दगडी बँकेची जुनी इमारती विकताना शेतकऱ्यांचे आणि ठेवीदारांचे भले कसे होईल, याचा विचार केला गेला आहे. ज्येष्ठ संचालक एकनाथ खडसे यांचा गैरसमज झाला असून, तो दूर केला जाईल. – संजय पवार (अध्यक्ष, जळगाव जिल्हा सहकारी बँक)