जळगाव समाचार | १ ऑक्टोबर २०२५
जिल्हा सहकारी बँकेची (JDCC) नवीपेठेतील ऐतिहासिक शाखा, जी ‘दगडी बँक’ म्हणून सर्वत्र ओळखली जाते, सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली व शतकोत्तर परंपरेचा वारसा लाभलेली ही वास्तू विक्रीस काढण्याचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक व आमदार एकनाथ खडसे यांनी या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला असून, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणारा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
खडसे यांनी म्हटले की, परंपरेचे, वारशाचे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल कोणत्याही विक्रीतून भागविता येणार नाही. जिल्हा बँक ही फक्त आर्थिक संस्था नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विश्वास आणि अभिमान आहे. अशा परिस्थितीत दगडी बँक विक्रीतून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरातन ठेवा मानल्या जाणाऱ्या या वास्तूचा पुनर्विकास करून तिचे संवर्धन करावे, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात खडसे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना निवेदनही दिले आहे.
संचालक मंडळाची बैठक बुधवारी होणार असून, त्यात दगडी बँक विक्रीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. सरकारी नोंदणीकृत मूल्यनिर्मात्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाहीबाबत विचारविनिमय होणार आहे. मात्र, जिल्हा बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता मालमत्ता विक्रीची अजिबात गरज नाही. त्यानंतरही विक्रीचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.
दरम्यान, नवीपेठेतील मध्यवर्ती भागात असलेली ही ब्रिटिशकालीन चार मजली इमारत सुमारे ६५०० चौरस फूट चटई क्षेत्रावर उभारलेली आहे. १९१६ मध्ये ही इमारत भाड्याने घेण्यात आली होती, तर १९२७ मध्ये ती फक्त सात हजार रुपयांत खरेदी करण्यात आली. दगडातून बांधकाम झाल्यानेच तिला ‘दगडी बँक’ अशी ओळख मिळाली. सध्या विक्रीसाठी प्रति चौरस फूट ४० हजार रुपये दर ठरविण्यात आला असून, त्यानुसार संपूर्ण इमारतीचे एकूण मूल्य १२ कोटी आणि त्यावर अतिरिक्त १५ कोटी रूपये घेण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. या संदर्भात अटी-शर्तींसह जाहिरातही प्रसिद्ध झाल्याचे समजते.