जळगाव समाचार डेस्क | ७ ऑक्टोबर २०२४
एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात सोमवारी रात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ६ जण गंभीर होरपळले असून, २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना कासोदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथील गढी भागात अनिल पुना मराठे हे आपल्या परिवारासह राहतात. रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात गॅस सिलिंडर बदलताना सिलिंडरमधून गॅस लिकेज होऊन अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच मराठे कुटुंबीय घाबरून घराबाहेर धावले. ग्रामस्थांनी मदतीसाठी मराठे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली, तेव्हाच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.
स्फोटाचा धक्का इतका प्रचंड होता की, आसपासचा परिसर हादरला आणि काही ग्रामस्थ फेकले गेले. या स्फोटात ८ जण भाजले गेले, ज्यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कासोदा येथील ग्रामस्थांनी जखमींना तत्काळ जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि घटनेची नोंद घेतली. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.