जळगाव समाचार डेस्क;
एमआयडीसी परिसरात असलेल्या सुनील आर मंत्री या फर्मच्या संगणक प्रणालीत फायरवॉल सॉफ्टवेअर नूतनीकरण न केल्याने सर्वर सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यात जळगावसह तीन ठिकाणाच्या कार्यालयातील सुमारे 6 कोटीचा डेटा हॅक झाला आहे. याप्रकरणी इंदु कॉम्प्युटरचे संचालक दीपक वडनेरे यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. (Jalgaon)
एमआयडीसीतील सुनील आर मंत्री या फर्मचे संचालक यश सुनील मंत्री (29) रा. आदर्श नगर यांच्या फर्मचे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी फायरवल कंपनीचे सॉफ्टवेअर लावले आहे. या सॉफ्टवेअरचे वार्षिक नूतनीकरण 21 जून रोजी संपणार होते. त्याबाबत दीपक वडनेरे यांनी तीन रोजी फोन करून विचारणा केली. त्यानुसार 5 जून रोजी यश मंत्री यांनी नूतनीकरणासाठी 48380 रुपये ऑनलाईन पाठवले. दरम्यान 12 जुलै रोजी मंत्री यांचे जळगाव धुळे व पुणे येथील कार्यालयावर सायबर हल्ला ( रेमसन वेअर ) होऊन तिन्ही कार्यालयांचा डेटा हॅक झाला. याबाबत कंपनीला फोन लावून विचारणा केली असता त्यांनी सॉफ्टवेअर नूतनीकरण झाले नसल्याचे सांगितले. यावरून वडनेरे यांनी पैसे घेऊन सॉफ्टवेअर अपडेट न करता फसवणूक केल्याची यश मंत्री यांनी तक्रार दिली. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.