पुन्हा धोनीपर्वाला सुरुवात; ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर, धोनी पुन्हा कर्णधार…

जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५

चेन्नई सुपर किंग्सला (CSK) आयपीएल 2025 मध्ये मोठा धक्का बसला आहे. संघाचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या फ्रॅक्चरमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करणार आहे.

न्यूज एजन्सी ANI आणि PTIच्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडेच्या चेंडूवर गायकवाडच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यानंतरही त्याने काही सामने खेळले, मात्र स्कॅनमध्ये फ्रॅक्चर स्पष्ट झाल्याने त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे.

CSK चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याची गुरुवारी अधिकृत घोषणा केली. ते म्हणाले, “गायकवाडची दुखापत गंभीर आहे आणि त्याच्याविना संघाचं नेतृत्व करणं ही गरज बनली आहे. अशा परिस्थितीत धोनीने पुढे येत कर्णधारपद स्वीकारलं आहे.”

सध्या CSK चं प्रदर्शन निराशाजनक आहे. संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील 4 सामने सलग गमावले आहेत. त्यामुळे CSK पॉइंट्स टेबलमध्ये 9व्या स्थानावर आहे.

शुक्रवारी (11 एप्रिल) CSK चा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे, आणि या सामन्यात धोनी पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

धोनीने यापूर्वी 2023 मध्ये CSK ला पाचव्यांदा आयपीएल विजेते बनवलं होतं. तो आयपीएल इतिहासातील सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने 133 सामने जिंकले आहेत.

धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू असून, त्याने 269 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 5342 धावा, 24 अर्धशतके, 368 चौकार आणि 257 षटकार आहेत.

आता ऋतुराजच्या अनुपस्थितीत, धोनी पुन्हा एकदा संघाला संकटातून बाहेर काढतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here