जळगाव समाचार | २६ ऑगस्ट २०२५
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना आळा बसत नसतानाच, धावत्या रेल्वेत प्रवासी महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शेगाव ते जळगाव दरम्यान महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात घडली.
या प्रकरणी युवराज हिम्मत पवार (२२), नरेंद्र संतोष पवार (२२) आणि प्रवीण मधुकर पवार (२१) या तिघांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पती व कुटुंबीयांसोबत शेगावहून जळगावकडे प्रवास करीत होती. डब्यामध्ये प्रचंड गर्दीचा फायदा घेत संशयितांनी महिलेवर आणि तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या नातेवाइक महिलेलाही अश्लील वर्तनाने त्रास दिला.
दरम्यान, भुसावळ स्थानकात गाडी पोहोचताच पीडितेच्या नातेवाइकांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.