जळगाव समाचार | १७ एप्रिल २०२५
“पोत मंत्रवून देतो” असे सांगत दोन अनोळखी इसमांनी एक वृद्ध महिलेची फसवणूक करत तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत लंपास केली. ही घटना १५ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जळगाव शहरातील भजेगल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या आपल्या मुलाकडे जाण्यासाठी जळगावात आल्या होत्या. त्या जुन्या खेडी रोडवरील दशरथ नगरात राहणाऱ्या आपल्या मुलाकडे चालत जात होत्या. दरम्यान, भजेगल्लीत त्यांना दोन अनोळखी इसमांनी थांबवले.
त्यातील एक इसम शरिराने जाड आणि डोक्यावर पांढरा रुमाल बांधलेला होता, तर दुसरा २० ते २५ वयोगटातील होता. त्यांनी कस्तुरबाईंना मंदिराचा पत्ता विचारला आणि नंतर “तू आजारी होतीस, तुझ्याकडून पैसे घेणार नाही, मी तुझी पोत मंत्रवून देतो” असे म्हणत वृद्धेला पोत काढायला लावली. विश्वासात घेत वृद्धेने पोत काढून दिल्यावर ते पोत घेऊन दोघे पसार झाले.
घडलेला प्रकार लक्षात येताच कस्तुरबाई यांनी आपल्या नातेवाईकांकडे जाऊन हकीकत सांगितली आणि तत्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस दोघा अनोळखी इसमांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.