जळगाव समाचार | ३० डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील योगेश्वर नगर परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी रात्री धडक कारवाई करत पर्दाफाश केला. या कारवाईत कुंटणखाना चालवणारा मालक व दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
योगेश्वर नगर परिसरातील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची आखणी करण्यात आली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिस पथकाने सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान वेश्याव्यवसाय चालवणारा मालक आणि दोन महिला संशयास्पद अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांनी तात्काळ तिघांनाही ताब्यात घेतले.
भरवस्तीत सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र मोतीराया, पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार तसेच महिला पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

![]()




