जळगाव समाचार | ५ मार्च २०२५
मुलीच्या आईने भेटण्यास विरोध केल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाने १७ वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी पूर्व येथे घडली. या घटनेत पीडित मुलगी ६० टक्के भाजली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपी तरुणही भाजला असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंधेरी पूर्व येथे पीडित मुलगी आई-वडील आणि तीन भावंडांसोबत राहते. तिचे वडील चालक आहेत, तर भाऊ खासगी कंपनीत काम करतो. पीडित मुलगी गेल्या दीड वर्षांपासून आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितूला ओळखते. सहा महिन्यांपूर्वी शेजाऱ्याने पीडित मुलीच्या आईला ती जितूसोबत फिरताना दिसल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने जितूला समज दिली आणि तिच्या मुलीला भेटण्यास मनाई केली.
दरम्यान, रविवारी उशिरा रात्री मुलीच्या आईला एका स्थानिक व्यक्तीचा फोन आला. त्याने मुलीवर कोणीतरी पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची माहिती दिली. आई तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि तिथे तिला मुलगी अर्धवट भाजलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेली दिसली. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगताना म्हणाली, “आई, माझी काही चूक नाही, जितूने माझ्यावर पेट्रोल टाकले आणि मला जाळले.”
या घटनेत पीडित मुलगी ६० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपी जितू देखील भाजल्याने त्याच्यावरही कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी आरोपी जितेंद्र तांबे विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ (१) आणि १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.