जळगाव समाचार डेस्क | ६ फेब्रुवारी २०२५
जंगलात अवैध शिकारीसाठी गेलेल्या गटातील एका व्यक्तीचा चुकून सुटलेल्या गोळीमुळे मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री पालघर जिल्ह्यातील बारशेती येथील जंगलात घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश जाण्या वरठा (वय ६०) आणि त्याचे सहकारी जंगलात रानडुक्कर आणि पट्टेरी वाघ यांची शिकार करण्यासाठी गेले होते. जंगलात रात्रीच्या वेळी काहीसा आवाज झाल्याने एकाने रानडुक्कर आल्याच्या संशयावरून बंदुकीचा ट्रिगर दाबला. मात्र, त्या गोळीचा लागून रमेश वरठाचा जागीच मृत्यू झाला.
दुर्घटना घडल्यानंतर भीतीपोटी संपूर्ण गट जंगलातून पसार झाला आणि मृतदेह तिथेच सोडून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी केलेल्या तपासानंतर शिकारीच्या या गटातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जंगलातील अलन डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात, ही माहिती या शिकाऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी तेथे शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटातील काही जण उशिरा पोहोचले आणि त्यांनी मोबाईलचा टॉर्च सुरू केला नव्हता, त्यामुळे प्राणी आल्याचा संशय घेत एका व्यक्तीने गोळी झाडली आणि हा अपघात घडला.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. जंगलात अवैध शिकार करण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी या भागातील गस्त वाढवण्याचे संकेत दिले आहेत.