⊕जळगाव समाचार डेस्क| २५ जानेवारी २०२५
एका धक्कादायक घटनेत वडिलांनीच आपल्या मुलीवर गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे, यावेळी भावानेही तिच्यावर गोळ्या झाडल्या. मंगळवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. 21 वर्षीय तनु गुर्जर हिची हत्या तिच्या वडील महेश गुर्जर आणि भाऊ राहुल यांनी केली. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे.
तनुचे विक्की मवई या तरुणासोबत गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तनुच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं गेलं होतं आणि 18 जानेवारीला लग्नाची तारीख ठरली होती. तनु या लग्नाला तयार नव्हती, तिच्यावर जबरदस्ती होत असल्याचं तिने मंगळवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं.
तनुने तिच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जबरदस्तीने लग्नासाठी तयार केलं जात असल्याचा आरोप केला होता. शिवाय आपल्याला घरच्यांकडून मारहाणीचा आणि जीवे मारण्याचा धोका असल्याचंही तिने म्हटलं होतं. “जर काही बरं-वाईट झालं तर याला माझं कुटुंब जबाबदार असेल,” असंही तिने स्पष्ट केलं होतं.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक धर्मवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तनुच्या घरी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गावात पंचायत बोलावली गेली, जिथे तनुने वडिलांसोबत राहण्यास नकार देत महिलांसाठीच्या संरक्षण केंद्रात ठेवण्याची मागणी केली होती.
महेश गुर्जर यांनी तनुशी एकांतात बोलण्याचा बहाणा केला. मात्र याचवेळी त्यांनी जवळील देशी कट्ट्याने तिच्या छातीत गोळी झाडली. त्यानंतर तिचा भाऊ राहुलनेही तिच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या तनुच्या डोक्यात, गळ्यात आणि चेहऱ्यावर लागल्या, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
हत्यानंतर वडील महेश आणि भाऊ राहुल यांनी घटनास्थळी पोलिसांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत महेशला अटक केली आणि त्याच्याकडील बंदूक जप्त केली. राहुल हा घटनास्थळावरून पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे.
https://x.com/sudhir_jha_says/status/1879468125231718673
तनुच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे. तिचं लग्न होण्यापूर्वीच झालेल्या हत्येमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी वडील महेश गुर्जर यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.