जळगाव समाचार डेस्क | ३ नोव्हेंबर २०२४
जळोद-अमळगाव रस्त्यावर दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन झालेल्या मारहाणीत एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार, ३ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील अमळगाव शिवारात घडली.
मृत तरुणाचे नाव विकास प्रवीण पाटील (३०, रा. अमलेश्वर नगर, अमळनेर) असे आहे. विकास आपल्या मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. तमाशा पाहून परतत असताना दुचाकीला कट लागल्याने इंडिकेटर तुटला. यावरून दोन गटांमध्ये वाद वाढला आणि अमळगाव-जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. या हाणामारीत गंभीर जखमी झाल्याने विकास पाटीलचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून नितीन पवार, अमोल कोळी, आणि हर्षल गुरव या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.