जळगाव समाचार | १३ जानेवारी २०२६
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहराच्या चारही बाजूंनी स्थिर सर्व्हेक्षण व भरारी पथके तैनात करण्यात आली असून, ममुराबाद रस्त्यावरील चौकीवर करण्यात आलेल्या कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नियमित तपासणीदरम्यान संशयास्पद कार थांबवून झडती घेतली असता, सुमारे २९ लाख रुपयांची रोख रक्कम, ८० ग्रॅम सोने आणि सुमारे तीन किलो चांदी आढळून आली. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कारमध्ये बऱ्हाणपूर येथील राकेश दामोदरदास श्रॉफ, जयेश राकेश श्रॉफ आणि चालक नवीन भावसार हे तिघे होते. त्यांनी हा मुद्देमाल बऱ्हाणपूर येथून जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी व नवीन दागिने खरेदीसाठी नेत असल्याचे सांगितले. तसेच हा संपूर्ण मुद्देमाल बऱ्हाणपूर येथील सुवर्ण पेढीचे मालक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या व्यवहारासंदर्भातील कोणत्याही पावत्या, बिल किंवा अधिकृत कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने भरारी पथकाचे प्रमुख अभिषेक सूर्यवंशी, स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख यशवंत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पथकाने संपूर्ण मुद्देमाल जप्त करून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केला. पंचनाम्यानंतर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, संबंधितांना आवश्यक पावत्या व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक तपासणी सुरू असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पावत्या सादर झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

![]()




