सावत्र आईने दोन मुलींना विष देऊन संपवले; सख्ख्या बापानेही केली मदत…

 

जळगाव समाचार डेस्क। १६ ऑगस्ट २०२४

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील अकबरपूर तिगरी गावात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे, जिथे सावत्र आईने आपल्या पतीसह मिळून दोन निष्पाप मुलींना विष देऊन हत्या (Murder) केली. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच एसपी अभिषेक झा आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिसांनी हत्येचा आरोपी महिला नाजरीन आणि तिचा पती मोहम्मद फरमानला ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अकबरपूर तिगरी गावातील रहिवासी नाजरीन आणि तिचा पती मोहम्मद फरमान यांनी आपल्या ८ वर्षांच्या हादिया आणि १० वर्षांच्या आफिया परवीन या दोन मुलींना विष देऊन त्यांचा जीव घेतला. नाजरीन या मुलींची सावत्र आई असून मोहम्मद फरमान हा पिता आहे. या क्रूर हत्येची वार्ता गावभर पसरताच गावात हाहाकार माजला, आणि शेकडो ग्रामस्थ फरमानच्या घराबाहेर जमले.
पोलीस तपासात समोर आले आहे की, मोहम्मद फरमानने दोन वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या पत्नी दिलशाना हिला घटस्पोट दिला होता आणि नाजरीनशी दुसरा विवाह केला होता. दिलशानापासून त्याला दोन मुली होत्या, हादिया आणि आफिया परवीन. मात्र, नाजरीनला या मुलींची आवड नव्हती आणि यामुळे या मुली आपले वडील आणि सावत्र आईसोबत राहण्याऐवजी आपल्या आजोबांकडे राहत होत्या. दरम्यान १४ ऑगस्ट रोजी, या दोन्ही मुली नाजरीनकडे खेळण्यासाठी आल्या असताना, नाजरीन आणि फरमानने त्यांना विष देऊन त्यांचा जीवनाचा अंत केला.
पोलिसांनी दोन्ही मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांना पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. दरम्यान, गावात आणि परिवारात या दुहेरी हत्याकांडामुळे शोककळा पसरली आहे. एसपी अभिषेक झा यांनी घटनास्थळी जाऊन तपासाचे आदेश दिले आहेत, आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here