जळगाव समाचार | १८ मार्च २०२५
राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, माढा तालुक्यातील लोणी गावात या योजनेचे पैसे महिलांच्या हातात न राहता पतीनेच खर्च केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या खात्यात जमा झालेले पैसे पतीने काढून दारूवर उडवले. यावर पत्नीने विचारणा करताच त्याने तिला मारहाण केली आणि कोयत्याने हल्ला केला.
या प्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने पतीसोबतच सासूवरही आरोप केला असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे महिलांच्या खऱ्या उपयोगासाठी जातात का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.