जळगाव समाचार | १९ मे २०२५
तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या चंदानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुमारे तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर जळगावमधून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यानंतर तो फरार होता. चंदानगर पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात येऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली आणि स्थानिक मदतीची मागणी केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांना आवश्यक ती मदत देण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थागुशा जळगाव येथील सफौ विजयसिंग पाटील आणि पोह अक्रम शेख यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने चंदानगर पोलिसांबरोबर समन्वय साधून तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अझहर खाटीक हा जळगावच्या मेहरुण परिसरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १६ मे २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता सापळा रचण्यात आला. पथकाने तत्परतेने पाठलाग करून अझहर खाटीकला अटक केली.
या अटकेनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंदानगर पोलीस स्टेशन, सायबराबाद (जि. तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) आणि बबन आव्हाड (पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या कारवाईत विजयसिंग पाटील आणि अक्रम शेख यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.