जळगाव समाचार | १७ एप्रिल २०२५
शहरातील सुप्रसिद्ध गोलाणी मार्केटमधील एका दागिन्यांच्या दुकानातून ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४३.८६० ग्रॅम सोने घेऊन दोन कारागीर फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण सराफा व्यवसायात एकच खळबळ उडाली असून, शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शंकर सातरा (वय रा. घोरादहा धन्याघोरी, जि. हुबळी, पश्चिम बंगाल) आणि मुस्तफा अली (रा. बागनान, जि. हावडा, पश्चिम बंगाल) अशी या दोन्ही फरार कारागिरांची नावे आहेत. विशेष म्हणजे, हे दोघेही गेल्या १५ वर्षांपासून विश्वासाने दुकानात कार्यरत होते.
श्यामसुंदर अंबालाल सोनी (रा. पटेल नगर, जळगाव) यांचे गोलाणी मार्केटमधील चौथ्या मजल्यावर दागिने बनवण्याचे दुकान आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्याकडून आलेले १४३.८६० ग्रॅम सोने कारागिरांकडे दागिने बनवण्यासाठी देण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी दुकानात आल्यानंतर श्यामसुंदर यांना दोघेही कामावर हजर नसल्याचे लक्षात आले.
इतर कारागिरांकडून विचारणा केली असता, रात्री सर्वजण झोपले असताना हे दोघे कोणालाही न सांगता निघून गेल्याची माहिती मिळाली. यानंतर सोनी यांनी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, “महत्त्वाच्या कामासाठी जात आहोत, काही दिवसांत परत येऊन सोने परत करू,” असे आश्वासन देण्यात आले. मात्र काही दिवसांनंतर त्यांचे मोबाईलही बंद येऊ लागले आणि अखेर विश्वासघात झाल्याची खात्री झाली.
सोनी यांनी या प्रकरणी १५ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन्ही कारागिरांविरोधात अपहाराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.