जळगाव समाचार | ३ मे २०२५
जळगाव जिल्ह्यातील किनोद गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26) या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तिच्या मृत्यूबाबत तिच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केला असून, ही आत्महत्या नसून खून असावा, असा आरोप त्यांनी केला आहे.
गायत्री आपल्या पती, सासू आणि दोन मुलांसोबत राहत होती. तिचा पती भाजी विक्री करतो, तर ती शिवणकाम करत होती. काही दिवसांपूर्वी मासिक पाळीच्या काळात तिने स्वयंपाक केल्याच्या कारणावरून घरात वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान तिच्या मृत्यूत झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
गायत्रीच्या मृतदेहावर खुणा आणि जखमा आढळून आल्याने तिच्या भाऊ आणि मावशीने खूनाचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, सासू आणि नणंदेने तिला मारहाण करून गळा दाबून ठार मारले आणि नंतर आत्महत्येचा बनाव केला.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सासू आणि नणंदेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून, मानसिक त्रास व पैशाच्या कारणांमुळे हा वाद उफाळून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे