जळगाव समाचार | २८ फेब्रुवारी २०२५
शहरातील एका उर्दू शाळेत ४२ वर्षीय महिला शिक्षिकेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि चेअरमन यांनी त्यांच्याशी अश्लील वर्तन करून धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित शिक्षिका २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत शाळेत काम करत असताना मुख्याध्यापक आणि चेअरमन यांनी त्यांना वारंवार त्रास दिला. अश्लील शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग करण्यात आला. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करत आहेत. या घटनेमुळे शहरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेतील इतर शिक्षक आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.