जळगाव समाचार | २७ मे २०२५
एरंडोल शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत २८ वर्षीय अमोल पाटील याच्यावर शेजारील काही व्यक्तींनी गंभीर हल्ला केला. किरकोळ वादातून सुरू झालेल्या या भांडणात अमोलला लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो सध्या कोमात आहे.
या घटनेनंतर परिसरात भितीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे. अमोलच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओळखले गेले असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.