जळगाव समाचार | १३ डिसेंबर २०२५
मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या महिलाविनयभंगाच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहिजे व फरार आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग विजयकुमार ठाकुरवाड यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मेहुणबारे पोलिसांनी ही प्रभावी कारवाई केली.
मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी गुरनं. ९७/२०१६ भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये महिलाविनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार (रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. महिलांशी संबंधित गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने आरोपीचा शोध घेणे प्राधान्याने आवश्यक होते. दरम्यान, आरोपी मुंबईत लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी विशेष पथकाची नेमणूक केली.
पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे अंधेरी, मुंबई येथून आरोपीस शिताफीने ताब्यात घेत मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे आणले. पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ शांताराम पवार, पोकॉ विनोद बेलदार व पोकॉ संजय लाटे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे फरार आरोपींमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

![]()




