जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५
तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेट या लोकप्रिय खेळाचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन होत आहे. 2028 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटला पुन्हा एकदा स्थान मिळाले असून याबाबत आयोजकांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
बुधवारी करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 6-6 संघ सहभागी होणार आहेत. या दोन्ही गटांसाठी प्रत्येकी 90 खेळाडूंना सामावून घेण्यात येणार असून, त्यामुळे प्रत्येक संघात 15 खेळाडूंचा समावेश असणार आहे.
या सामन्यांचे स्वरूप टी-20 असेल आणि यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी स्पर्धा रंगणार आहे. ही माहिती समोर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, 2028 मधील ऑलिंपिकमध्ये क्रिकेट पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.
गौरवाची बाब म्हणजे, क्रिकेटला अखेर ऑलिंपिकसारख्या जागतिक स्पर्धेत स्थान मिळाले असून, यामुळे क्रिकेटच्या जागतिक लोकप्रियतेला आणखी बळ मिळणार आहे.