जळगाव | २२ सप्टेंबर २०२५
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंडीया विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडून १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
भुसावळ बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी येथील प्रकाश हुंदामल सारडा आपल्या घरी ऑनलाईन सट्टेबाजी चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. शरद बागल यांच्या पथकाने छापा टाकला.
यावेळी कारवाईत प्रकाश हुंदामल सारडा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) व रणजीत चत्रभान हंडी (वय ३५, रा. गणपती नगर, जळगाव) हे दोघे क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग करताना आढळून आले. त्यांच्याकडून सट्ट्याचे साहित्य व रोख रक्कम मिळून एकूण १,०५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी (भुसावळ) संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनि. शरद बागल, पो.उपनि. रवि नरवाडे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोकॉ. दर्शना पाटील, चा. पोहेकॉ भरत पाटील यांनी ही कारवाई केली.