जळगाव समाचार डेस्क | १२ डिसेंबर २०२४
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागात बदल करत डॉ. रामेश्वर नाईक यांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या पदावर यापूर्वी कार्यरत असलेल्या मंगेश चिवटे यांची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी या बदलाबाबत अधिकृत पत्र जारी केले आहे.
डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी वैद्यकीय आणि धर्मादाय क्षेत्रात मोठे काम केले आहे. २०१४ साली वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झालेल्या नाईक यांनी विविध धर्मादाय संस्थांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
डॉ. नाईक यांनी राज्यभरात ११५ पेक्षा जास्त मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमधून ब्रेस्ट कॅन्सर, डायबेटिस, कुपोषण, आणि अवयवदान यांसारख्या विषयांवर काम केले आहे. याशिवाय, त्यांनी ८९ मोतीबिंदू उपचार शिबिरे आणि २२ रक्तदान शिबिरेही यशस्वीरीत्या राबवली आहेत.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी डॉ. रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “डॉ. नाईक यांच्या कामामुळे राज्यातील गरजू नागरिकांना आरोग्यसेवेसाठी अधिक आधार मिळेल.”