नागपूरमध्ये हिंसाचार; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतून उपद्रवींना खडेबोल…

जळगाव समाचार | १८ मार्च २०२५

नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री दोन गटांत तुफान दगडफेक आणि हिंसाचार झाला. जमावाने वाहनांची तोडफोड केली आणि आगी लावल्या. या घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून 50 जणांना अटक केली आहे. सध्या नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. दंगा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही.’

हिंसाचारानंतर नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हंसापुरी आणि भालदारपुरा भागात मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि हल्ले झाले. पोलिसांना जमावाला नियंत्रित करण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. या दंगलीत 33 पोलीस आणि 5 नागरिक जखमी झाले आहेत.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाच्या कबरी हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले होते. याच पार्श्वभूमीवर नागपुरात हिंसाचार उफाळला.

‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वातावरण तापले असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here