जळगाव समाचार डेस्क | २७ सप्टेंबर २०२४
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य देत सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार स्मिताताई वाघ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मागील चार वर्षांत जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या मदतीने रुग्णालयाचे सर्वांगीण सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसी निधीच्या सहाय्याने या जळीत कक्षाचे बांधकाम करण्यात आले असून, सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या हक्काचे अत्याधुनिक रुग्णालय उपलब्ध झाले आहे.
अत्याधुनिक जळीत कक्षाचे वैशिष्ट्ये
या नव्याने उभारलेल्या मॉड्युलर जळीत कक्षात 20 खाटांची सोय असून त्यात 5 खाटा आयसीयूसाठी, 5 विशेष जळीत खाटा आणि 10 जनरल खाटांचा समावेश आहे. या कक्षात वातानुकूलित सोयीसह जळालेल्या रुग्णांसाठी आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. हायड्रोशन आणि स्क्रीन ग्राफ्टिंगसारख्या शस्त्रक्रिया तसेच जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल आणि मृत्यू दर कमी होईल.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सिव्हील सर्जन डॉ किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अक्षय सरोदे डॉ., डॉ. सुरेखा चव्हाण डॉ. राजेश जांभुळकर वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड, योगिता बावस्कर , विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ, राजेश जांभूळकर, डॉ. चंद्रमोहन हरणे तसेच अधिसेविका प्रणीता गायकवाड, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मेट्रन मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. गिरीश ठाकूर यांनी डीपीडीसीच्या निधीमधून उभारण्यात आलेल्या मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाच्या महत्त्वाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. मारुती पोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी केले.