जळगाव समाचार | 11 सप्टेंबर 2025
जळगाव शहरात अवैध शस्त्रांसह फिरणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या चौघांना जळगाव शहर पोलीसांनी अटक केली. ही कारवाई दि. 11 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 4.15 वाजता गेंदालाल मिल परिसरात सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय 33, रा. गेंदालाल मिल), निजामोददीन शेख हुसेनोददीन शेख (वय 31, रा. आझाद नगर), शोएब अब्दुल सईद शेख (वय 29, रा. गेंदालाल मिल) आणि सौहिल शेख उर्फ दया (वय 29, रा. शाहु नगर) यांचा समावेश आहे. हे आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मॅगझिन बेकायदेशीररीत्या बाळगत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, एक मॅगझिन आणि मारुती सुझुकी कार (नोंदणी क्रमांक MH 43 AR 9678) असा एकूण 1,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. युनुस उर्फ सद्दाम पटेल याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार असल्याची नोंद पोलीसांनी केली आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सफौ. सुनिल पाटील, पोहेकॉ. उमेश भांडारकर, पोहेकों. सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, भगवान पाटील, प्रणय पवार, अमोल ठाकुर, भगवान मोरे आणि राहुलकुमार पांचाळ यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.