चोपडा तालुक्यात २८ वर्षीय विवाहितेची १५ दिवसाच्या व अडीच वर्षांच्या चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या…

The dead woman's body. Focus on hand

 

जळगाव समाचार | २९ जानेवारी २०२६

चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात बुधवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली. २८ वर्षीय विवाहित महिला पमिता डोंगरसिंग पावरा हिने आपल्या अडीच वर्षांच्या मुलगा विरेन आणि केवळ १५ दिवसांच्या नवजात बाळासह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पमिता व तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. मंगळवारपासून पमिता ही दोन्ही मुलांसह बेपत्ता असल्याची नोंद होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पमिता काही दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती. प्रसूतीनंतर विश्रांतीसाठी ती माहेरी आली होती. मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी तिचा पती तिला पुन्हा सासरी घेऊन गेला. त्यानंतर मंगळवारी पमिता अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, मंगळवारी बेपत्ता असल्याची तसेच बुधवारी मृत्यूची माहिती सासरकडील मंडळींकडूनच देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ आकाश पावरा याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, प्रसूतीनंतर अवघे १५ दिवस झाल्याने पमिताला आणखी काही दिवस माहेरीच राहू द्यावे, अशी विनंती कुटुंबीयांनी सासरच्यांकडे केली होती. मात्र ही विनंती धुडकावून लावत मेहुण्यांनी तिला जबरदस्तीने सासरी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here