जळगाव समाचार | १७ एप्रिल २०२५
चोपडा बसस्थानक परिसरात चोरीसाठी संधी शोधणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी चक्क पोलीस खात्यातीलच एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.
१६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास चोपडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारवाई करत चार जणांना अटक केली. यामध्ये जालना पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मालटे (वय ५८) यांचा समावेश आहे. ते अवघे तीन महिन्यांवर सेवानिवृत्त होणार होते. मात्र, या सेवानिवृत्तीनंतरच्या वाटेवर त्यांनी चक्क चोरट्यांची साथ धरल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईत पकडले गेलेले इतर तिघे म्हणजे श्रीकांत बघे (वय २७, रा. खामगाव), अंबादास साळगावकर (वय ४३, रा. अकोला) आणि रउफ शेख (वय ४८, रा. बीड) हे आहेत. विशेष म्हणजे अंबादास साळगावकरवर यापूर्वी तब्बल २७ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही टोळी बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची दागिने व रोख रक्कम चोरण्याच्या तयारीत होती. पोलिसांना या टोळीबाबत आधीच माहिती मिळाली होती. त्यानुसार बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला आणि टोळीला वाहनासह धरणगाव नाक्यावर अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि एलसीबीचे पोउनि गणेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ. विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र पाटील व हेमंत पाटील यांचा समावेश होता.
या प्रकारामुळे एकेकाळी गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल केल्याने पोलीस खात्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

![]()




