जळगाव समाचार | २१ मे २०२५
चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीजजवळ मंगळवारी सकाळी ११.३० वाजता एक भीषण अपघात झाला. भरधाव बसने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले.
मृतांमध्ये रईसखाँ रशीदखाँ पठाण (२९, रा. बारगनअळी, चोपडा) आणि रवींद्र भिवसन बहारे (४५, रा. चुंचाळे) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रईसखाँ यांचा दोन दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. रवींद्र बहारे हे पत्नीसमवेत बाजारासाठी आले होते. अपघातात त्यांची पत्नी थोडक्यात बचावली आहे. रईससोबतचा शाकीर शेख साबीर शेख हा जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना चोपडा आगाराच्या बसने घडवली. बसचालक दीपक अशोक पाटील (रा. अरुणनगर) हे लासूरहून चोपड्याकडे येत असताना हा अपघात झाला. चालकाने बसचे ब्रेक फेल झाल्याचे सांगितले, मात्र आगारप्रमुखांनी हे कारण फेटाळून लावल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याशिवाय तालुक्यात आणखी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. यावल-कोरपावली रस्त्यावर स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. यात विशाल कुशल येवले (१७) आणि त्यांची काकू निशा जितेंद्र येवले (२०) हे जागीच ठार झाले. दुसऱ्या घटनेत पिकअपने दुचाकीला धडक दिली. यात सुभाष बाबूराव पाटील (७०, रा. आडगाव) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा नातू कल्पेश पाटील (१६) गंभीर जखमी झाला. या सर्व घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.