जळगाव समाचार | शिवजयंती विशेष लेख
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर ते एक विचार, एक तत्वज्ञान आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा सर्वोत्तम नमुना आहेत. महाराजांचे चरित्र आणि कार्य आपण अनेकदा वाचतो, ऐकतो आणि अभिमानाने सांगतो. पण खरा प्रश्न असा आहे – आपण महाराजांना खऱ्या अर्थाने जाणण्याचा किती प्रामाणिक प्रयत्न केला आहे?
आज शिवरायांवर भाषणं दिली जातात, पोस्ट टाकल्या जातात, मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. पण त्यांच्या विचारांचा स्वीकार आपल्या जीवनात आपण किती प्रमाणात केला आहे? केवळ जयजयकार करून, घोषणांनी आसमान दणाणून टाकून महाराजांचा वारसा टिकवला जाईल का? की खऱ्या कृतीद्वारे त्यांचा विचार रुजवणे आवश्यक आहे?
शिवराय फक्त इतिहासापुरते? की वर्तमानासाठीही आदर्श?
शिवाजी महाराजांची कार्यशैली केवळ भूतकाळातच मर्यादित नाही, तर ती वर्तमान आणि भविष्य यांसाठीही मार्गदर्शक आहे. आज समाजात भ्रष्टाचार, अन्याय, महिलांवरील अत्याचार, राजकीय स्वार्थ आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. महाराजांनी याच गोष्टींविरोधात संघर्ष केला होता. मग आपण त्यांचे अनुयायी म्हणून काय करत आहोत?
१) गडकोटांची अवस्था – केवळ पोस्ट टाकून जबाबदारी संपते का?
शिवरायांनी ज्या किल्ल्यांसाठी आपले रक्त सांडले, ते किल्ले आजही आपल्या संस्कृतीचे अभिमानस्थळ आहेत. पण आपण त्यांची किती काळजी घेतो? गडकोटांवर प्लास्टिकचा कचरा, नासधूस, अस्वच्छता, मद्यपान याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गडसंवर्धनाच्या नावाखाली केवळ सोशल मीडियावर फोटो टाकले जातात, पण प्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांची संख्या कमी आहे.
म्हणूनच, फक्त पोस्ट टाकून नाही, तर गडकोट जपण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. स्वच्छता मोहिमा राबवणे, स्थानिक गडरक्षकांना सहकार्य करणे, सरकारकडून पुरेशी देखभाल व्हावी यासाठी दबाव टाकणे हे खरे शिवभक्त असण्याचे लक्षण आहे.
महाराजांचा विचार – आपण तो आत्मसात केला का?
शिवरायांचा विचार रुजवण्यासाठी तो आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे. केवळ भाषणात आणि पोस्टमध्ये शिवराय असतील, पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्या विचारांचा अंगीकार नसेल, तर आपण त्यांचे खरे अनुयायी म्हणवून घेण्यास पात्र नाही.
२) स्त्रियांविषयी महाराजांचे विचार – आपण किती स्वीकारतो?
शिवाजी महाराज हे स्त्रीसन्मानाचे सर्वोत्तम उदाहरण होते. त्यांनी युद्धकाळातही शत्रूंच्या स्त्रियांवर हात उचलू दिला नाही. जो कुणी स्त्रियांवर अत्याचार करेल, त्याला कठोर शासन करण्यात आले. मग आपण आज स्त्रियांविषयी त्यांच्याच विचारांचे पालन करतो का?
आज महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. मग आपण शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हक्कांसाठी उभे राहतो का?
फक्त महाराज स्त्रियांचा सन्मान करत होते, हे सांगून उपयोग नाही; तो विचार आपल्या वर्तनात आणणे महत्त्वाचे आहे. घरातील महिलांना स्वतंत्र निर्णय घेऊ देतो का? त्यांचे शिक्षण, करिअर, स्वातंत्र्य यास आपण पाठिंबा देतो का? की पुरुषी अहंकार अजूनही आडवा येतो?
शिवरायांनी त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्याकडून मूल्ये घेतली. जिजाऊंसारख्या आईनेच महान योद्धा घडवला. आपण सारे जिजाऊंचे गोडवे गातो, पण आपल्या आई, पत्नी, बहीण, मैत्रीण यांना जिजाऊंसारखे विचार रुजवू देतो का? की समाजाच्या तथाकथित बंधनांमध्ये त्यांना अडकवतो?
स्वराज्याची संकल्पना – आजच्या काळात लागू पडते का?
शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना मांडली होती – म्हणजेच लोकहिताचे राज्य. ते केवळ एका राजकीय व्यवस्थेपुरते मर्यादित नव्हते, तर न्याय, समानता, सुरक्षितता आणि स्वाभिमानावर आधारलेले होते. आजच्या काळात ही संकल्पना किती अस्तित्वात आहे?
३) राजकारण आणि भ्रष्टाचार – महाराज असते, तर ते शांत बसले असते का?
आज आपण स्वराज्याचे नाव घेतो, पण प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात अनेक स्वार्थी लोक घुसले आहेत. शिवराय असते, तर ते नक्कीच अन्यायकारक व्यवस्थेला झुंज दिली असती.
मग आपणही शिवरायांचा आदर्श ठेवून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो का? समाजाच्या हितासाठी निस्वार्थी काम करतो का? की फक्त मोठमोठ्या घोषणा देतो? स्वराज्य फक्त महाराजांनी निर्माण केलेली व्यवस्था नव्हती, तर ती एक जबाबदारी होती. आजच्या काळात आपण ती जबाबदारी घेतो का?
म्हणूनच…
शिवरायांचे नाव घेऊन जयजयकार करणे सोपे आहे, पण त्यांचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे कठीण आहे. महाराज हे कर्तृत्व, धैर्य, न्याय, संयम आणि स्त्रीसन्मानाचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचे खरे अनुयायी बनायचे असेल, तर केवळ घोषणा देऊन, पोस्ट टाकून उपयोग नाही.
१) गडकोटांची काळजी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
२) स्त्रियांचा आदर आणि समानतेचा विचार आचरणात आणावा.
३) समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.
४) महाराजांनी शिकवलेला स्वराज्याचा विचार आत्मसात करावा.
५) स्वार्थ सोडून देशसेवा आणि समाजसेवेला प्राधान्य द्यावे.
शिवरायांना खऱ्या अर्थाने जाणायचे असेल, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करावा लागेल… आणि कृतीत उतरवावा लागेल.
लेख – आकाश शारदा जनार्दन बाविस्कर
मुख्य संपादक, जळगाव समाचार
जय जय महाराष्ट्र! जय शिवराय!