जळगाव समाचार डेस्क | ४ फेब्रुवारी २०२५
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी महाराजांनी सुटका करण्यासाठी मुघलांना लाच दिल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेसंदर्भात काही वादग्रस्त दावे केले. त्यांच्या मते, महाराजांनी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या पत्नीला लाच दिली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर त्यांनी पोस्ट करत म्हटले की, “शिवरायांबद्दल चुकीचे वक्तव्य करून इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण?”
तसेच, त्यांनी हिरकणीबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल आक्षेप घेतला. “हिरकणी नावाचे कोणतेही व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते,” असे म्हणणाऱ्या सोलापूरकरांना आव्हाड यांनी “महामूर्ख” असे संबोधले.
शिवप्रेमींमध्ये या वक्तव्यावरून तीव्र नाराजी आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे,” असेही आव्हाड म्हणाले. शिवप्रेमींनी याला योग्य प्रत्युत्तर द्यावे आणि गरज पडल्यास रायगडावर नेऊन हिरकणी बुरुज दाखवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणावर आता मोठा वाद निर्माण झाला असून, शिवप्रेमींसह अनेक राजकीय नेत्यांनीही सोलापूरकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे.